लातूर : वृत्तसंस्था
मागच्या दहा वर्षांत देशातील अनेक घटना पाहता लोकशाहीसाठी घातक आहेत. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार विकत घेतले गेले. संविधानाच्या विरोधात अनेक घटना बघायला मिळत आहेत. भारताच्या लोकशाहीसाठी अनेकांनी त्याग केला आहे. परंतु, भाजप नेते, मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भारतीय लोकशाही कमजोर करण्यासाठी संविधान बदलण्याची मानसिकता भाजपची असल्याचे ‘दावे के साथ कहती हूँ’ असे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केला.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख, वैशाली देशमुख, माजी मंत्री विनायक पाटील, माजी आमदार त्र्यंबक भिसे, बसराज पाटील नागराळकर उपस्थित होते.
यावेळी प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दहा वर्षांच्या सत्तेतील कार्यपद्धतीवर आणि वाढलेली महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर बोलताना प्रखर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. देशातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर मात्र जीएसटी लादून त्यांना कर्जाच्या खाईत लोटले. मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी सुमारे तीनशे दिवस आंदोलन केले. शेतकरी आंदोलनात अनेक शेतकरी शहीद झाले. मात्र पंतप्रधान मोदींनी या शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही.