जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ-फैजपूर रस्त्यावर असणाऱ्या अकलूज टोलनाक्यावर एका कारमधून ८ लाख ६५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधिताने पुरावे सादर करण्याची तयारी दाखविली आहे. सुनावणीदरम्यान या रोकडविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि, फैजपूर प्रांताधिकारी व सहायक जिल्हाधिकारी देवयानी यादव, डीवाय. एसपी तथा परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी ही कारवाई केली. भुसावळ शहरातील एका व्यावसायिकाच्या वाहनाची या पथकाने तपासणी केली. तेव्हा कारमध्ये ८ लाख ६५ हजारांची रोकड असल्याचे दिसून आले. त्यानंतर रोकड ताब्यात घेण्यापूर्वी प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा केला आणि रोकड कोषागार कार्यालयात जमा केली. फैजपूर परिसरात असलेल्या पेट्रोलपंपावरून रोकड नेऊन ती बँकेत भरली जाणार होती. मात्र रोकड नेताना सोबत पुरावे नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागले आहे. संबंधित कारमालकाने रोकडचा तपशील सादर करण्याची तयारी दाखविल्याने प्रशासनाने त्यांचे वाहन ताब्यात घेतले नाही.