यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील बोराडे येथील मागासवर्गीय वस्तीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. नागरिकांनी लगेचच आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत तब्बल एक लाखांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोराळे ता. यावल येथील मागासवर्गीय वस्तीत शरद दिनकर वानखेडे हे भाड्याच्या घरात राहतात. ते गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले होते. यादरम्यान त्यांच्या बंद घराला सकाळी ९ वाजेच्या सुमारास आग लागली. हा प्रकार निर्दशनास येताच नागरिकांनी तेथे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य, अन्न- धान्य, कपडे जळून खाक झाले. यात वानखेडे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचा पंचनामा तलाठी मधुराजे पाटील यांनी केला. नुकसानग्रस्ताला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे