जळगाव : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी स्वतः खडसेंनीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते; पण त्याला पंधरवडा उलटूनही अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. त्यावरून कुजबुज सुरु असतानाच, गुरुवारी खडसे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला.
त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश झाला नसला तरी, रक्षा खडसे आपल्या स्नुषा आहेत, तसेच मी भाजपमध्ये जाणार आहेच, त्यामुळे आपण त्यांचे काम करणार आहोत. त्यांच्या मताधिक्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. अद्याप भाजपमध्ये प्रवेश झाला नसल्याने आपण महायुतीच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठीच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो नाही, असेही ते म्हणाले. पक्षाच्या सदस्यत्वाचा आपण राजीनामा दिला आहे; परंतु आमदारकीचा राजीनामा अद्याप दिलेला नाही. शरद पवार यांनी आपल्याकडे आमदारकीचा राजीनामा मागितलेला नाही. त्यामुळे शरद पवार सांगतील तेव्हाच, आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, अशीही माहिती त्यांनी दिली.



