जळगाव : प्रतिनिधी
लग्नाच्या रात्रीनंतर पहाटेच्या सुमारास नववधू लाखाचे दागिणे घेवून पसार झाली. जळगावातील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी लग्न जुळविणार्या पूजा विजय माने (32, रा.महाडीकवाडी, सांगली), नववधू नंदीनी राजू गायकवाड (रा. अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथून पसार झाल्यानंतर याच तरुणीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसर्या तरुणासोबत लग्न लावल्याचा प्रकार घडला. फसवणूक करणारे रॅकेटच कार्यरत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशिनाथ चौधरी यांचा मुलगा मयुर याचे लग्न करायचे असल्याने त्यासंदर्भात 13 फेब्रुवारी रोजी त्यांना पूजा विजय माने या महिलेचा फोन आला. तिने आमच्याकडे मुलगी असून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे येवून मुलगी बघून घ्या असे सांगितले. मुलगी पाहिल्यानंतर पसंती झाली व माने या महिलेने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले.
16 मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये मयूर चौधरी याचे नंदीनी गायकवाड या तरुणीसोबत लग्न लागले. यावेळी मुलीकडून पूजा माने, नंदीनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले. लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री सर्वजण गाढ झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास नववधू नंदीनी व तिची मैत्रीण या घरात दिसल्या नाही. त्यामुळे चौधरी कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र तरी देखील त्या सापडल्या नाहीत. यावेळी त्यांच्या शेजारी राहणार्या महिलेने त्यांना सांगितले की, पहाटेच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिले.