भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील गिरणा नदीकाठालगत असलेल्या जुने वडजी शिवारातील गोरख महारू शेवरे यांच्या शेतात बिबट्याने हल्ला करून गोन्हा ठार केल्याची घटना बुधवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडली.
सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही वर्षांपासून वडजी परिसरात विशेष करून गिरणा नदी परिसरातील शिवारात बिबट्याचे दर्शन होत असते. जुने वडजी हा शिवार गिरणा नदीच्या परिसरात येत असल्याने नेहमीच हिरवा असतो. या वर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर ज्वारी, मका, ऊस क्षेत्र बहरले आहे. या क्षेत्रात बिबट्याचा अधिवास असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. गिरणा नदीकाठावरील जुने वडजी शिवारात गोरख महारू शेवरे यांच्या शेतात दोन गायी, एक गोन्हा बांधलेला होता. मंगळवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत गोरख शेवरे हे टॅक्टरने आपली जमीन तयार करत होते.
सकाळी सात वाजता गोरख शेवरे, प्रकाश पाटील, रवींद्र परदेशी हे शेतात जात असताना रस्त्यावर त्यांना बिबट्या दिसला, तर शेतात गोन्ह्याचा फडशा पाडलेला त्यांना दिसला. वनरक्षक बी.एस. वानखेडे यांनी मृत जनावराचा पंचनामा केला. दरम्यान, रब्बी हंगामातील कामे शेवटच्या टप्प्यात असून ज्वारी, मका, बाजरी यासारखी पिके अजूनही शिवारातच आहेत. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे चालू आहेत. अशातच या शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व शेतमजुरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.