जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात अवैध धंद्यावर सलग तीन दिवसांपासून पोलीसांनी छडा लावण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत ५ गावठी कट्टे,१ मँगझीन व ७ जिवंत काडतूस अशा १ लाख ४७ हजाराच्या मुद्देमाल हस्तगत करून चौघा जणांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपींना जळगाव तालुका व वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव फाट्याजवळील उड्डाण पुलाजवळ गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची तसेच विदगाव येथील वैष्णवी हॉटेलजवळ एका तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर फळे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, महेश महाजन, ईश्वर पाटील, विजय चौधरी यांचे पथक तपासकामी विदगाव येथे गेले होते. तर पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सुनील दामोदर, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना झाले होते.
दोन्ही पथकांनी मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली. ऑर्डनन्स फॅक्टरी पुलाजवळ संजय गोपाल चंदेले रा.वरणगाव, गजानन शांताराम वानखेडे रा.तरोडा, ता.मुक्ताईनगर, निखिल महेश चौधरी रा. वरणगाव यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील १ लाख १४ हजार किमतीचे ४ गावठी पिस्तूल, मॅक्झीन, ४ जिवंत काडतूस जप्त केले. दुसऱ्या पथकाने वैष्णवी हॉटेल विदगाव येथील सागर दिलीप कोळी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील १ गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूस असा ३३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकाच दिवशी ५ गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहे. संशयित आरोपींना जळगाव तालुका आणि वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.