चाळीसगाव : प्रतिनिधी
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहरातील तीन सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिनही सराईत गुन्हेगारांवर हद्दपार करण्याचे आदेश चाळीसगाव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद हिले यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, आगामी लोकसभा निवडणूकीच्या काळात शांतता व भयमुक्त वातावरण होण्यासाठी चाळीसगांव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी केली आहे. या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस संदीप पाटील यांनी चाळीसगाव शहरातील सराईत गुन्हेगार राहूल आण्णा जाधव, श्याम उर्फ आण्णा नारायण गवळी आणि हैदरअली आसीफअली सैय्यद तिघे रा. चाळीसगाव यांच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून चाळीसगावचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे पाठविला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यात राहूल जाधव आणि श्याम गवळी या दोघांना प्रत्येक १ वर्षांसाठी हद्दपार तर हैदरअली आसीफअली सैय्यद याला दोन वर्षांसाठी जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश पारित केले आहे. हद्दपारीच्या प्रस्तावासाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ विनोद भोई, पोना तुकाराम चव्हाण यांनी सहकार्य केले.