यावल : प्रतिनिधी
अंजाळे गावाजवळ मोर नदी पात्रात पुलाखालून जेसीबीच्या सहाय्याने गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर यावल पोलिसांनी कारवाई केली. त्यात एक जेसीबी, तीन डंपर आणि एक ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी यावल पोलिस आणि विशेष पथकाला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश दिले.
सविस्तर वृत्त असे कि, त्यात अंजाळे येथील मोर नदीच्या पुलाखाली मंगळवारी सकाळी १० वाजता यावल पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक विनोद गाभणे, हवालदार अनिल इंगळे, गणेश ढाकणे, अशोक बाविस्कर, वासुदेव मराठे यांनी ही कारवाई केली.
यात जेसीबी क्रमांक टीएस ०१ ईएल ७२३९ तसेच डंपर क्रमांक एमएच २७ एक्स १५३७, डंपर क्रमांक एमएच १९ सीव्ही ७०९८, डंपर क्रमांक एमएच १९ झेड ५८०४, आणि ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३७ एल ५९७३ असे एक जेसीबी सह तीन डंपर व एक ट्रॅक्टर, ट्रॉली या पथकाला मिळून आली. ही वाहने तसेच अवैध उपसा केलेली एक ब्रास वाळू असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार नितीन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात चालक आणि इतर नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे