भुसावळ : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात शरद पवार गटाने उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार गटाचे कार्यकर्ते नाराज झाले होते, तर नुकतेच भुसावळ येथे माजी आ.संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा सुद्धा झाला असून याच मेळाव्यात माजी आ.चौधरी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. २१ रोजी मी त्यांना भेटेल, त्यांनी सध्या दिलेला उमेदवार बदलला नाही तरी आपण २४ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगत माजी आमदार संतोष चौधरींनी बंडाचे निशाण फडकावले.
चौधरी म्हणाले की, पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनीच आपल्याला उमेदवारी करण्याबाबत विचारणा केली होती. आपण आदेश द्याल तर निवडणूक लढू, असे त्यांना सांगितले. यानंतर पक्षाकडे केवळ ॲड. रवींद्र पाटील व मी असे दोनच उमेदवार होते. पण मुक्ताईनगरातून कुटनीती झाल्याने वेगळाच उमेदवार दिला गेला. आम्ही अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत आहोत. तरीही डावलले.अशी खंत व्यक्त केली.
संतोष चौधरींना पवारांनी कामाला लागण्याचे सांगून उमेदवारी निश्चित केली होती. यानंतर रेल्वे स्थानकावर त्यांना घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली गर्दी पाहून विरोधकांच्या तोंडाला फेस आला. यानंतर मुक्ताईनगरातून कुटनीती सुरु झाली. यामुळे उमेदवारी बदलली. पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्यांना हीच वागणूक काय? या संदर्भात आपण जयंत पाटलांना फोन करुन विचारणा करू, असे अनिल चौधरी यांनी सांगितले. भुसावळातील मेळाव्याला उपस्थित असलेले संतोष चौधरी समर्थक.
एकनाथ खडसे भाजपच्या दरवाजात आहे. पण आत बसलेले जिल्ह्यातील काही जण त्यांना मध्ये येऊ देत नाहीत. ज्या खडसेंनी पवारांना धोका दिला, त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आपण शरद पवारांकडे करणार आहोत. यासोबत १३७ कोटींच्या दंडाच्या आदेशावर दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी आपण मंत्रालयात तक्रार करणार असल्याचे चौधरींनी सांगितले. राष्ट्रवादीने पैशांवर उमेदवारी दिली हे पहिल्यांदाच पाहिले आम्ही आजपर्यंत पक्षाकडे निवडणुकीसाठी एक रुपया मागितला नाही. अनेकवेळा त्याग केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पैशांवर उमेदवारी मिळते, हे पहिल्यांदाच पाहिले. केवळ पैशांवर निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते सोबत असावे लागतात. १९९१ मध्ये अवघ्या ४५० रुपये खर्चात मी नगरसेवक झाल्याचे चौधरींनी सांगितले.