धुळे : वृत्तसंस्था
घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती साक्री यांना देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या साक्री पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंत्याला धुळे एसीबीने अटक केली. परेश प्रदीपराव शिंदे (34) असे लाचखोराचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, 40 वर्षीय तक्रारदार यांना शासनाच्या शबरी आवास योजनेंतर्गत घर बांधायचे आहे. तक्रारदार यांना सदर योजनेंतर्गत अनुदानित निधी प्राप्त करण्याकरीता आरोपी शिंदे यांच्याकडून तक्रारदार यांच्या घराच्या बांधकामाचे फोटोज तसेच पाहणी केल्याचा अहवाल पंचायत समिती, साक्री येथे सादर करणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजारांची लाच सोमवारी मागितली व तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, रामदास बरेला, सुधीर मोरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.