पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील धाबे येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले असून संपूर्ण पवार परिवार रस्त्यावर आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, धाबे गावातील अनिल पवार यांचे घर दूध डेअरीला लागून असलेल्या मंदिराजवळ आहे. पवार हे रात्री जेवण करून झोपलेले असताना मंदिराची वायर त्यांच्या घरावर पडल्याने आग लागली. आगेची झळ लागताच तत्काळ अनिल पवार व त्यांचे कुटुंब झोपेतून उठून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र लोखंडी पेटीत ठेवलेले ६० हजार रुपये जळून खाक झाले. संसारोपयोगी वस्तू कपडे, धान्य, भांडी आदी जळून खाक झाल्याने पवार परिवार उघड्यावर आला आहे. पारोळा न. पा. चे अग्निशमन बंबचालक मनोज पाटील व जितेंद्र पाटील यांच्यासह गावातील तरुणांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आगीने रुद्रावतार घेतल्यामुळे घर जळून खाक झाले.