अमळनेर : प्रतिनिधी
अमळनेरहून कळमसरे येथे दुचाकीने येत असताना उड्डाणपुलावर तरुणाचे नियंत्रण ढासळल्याने दुचाकी खाली कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, गुरुवारी उपचारादरम्यान धुळे जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, मृताचे नाव विकास शंकर साळुंखे (पारधी, ३५) असे आहे, या घटनेने पारधी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विकास साळुंखे हा बांधकाम कारागीर होता. बांधकामाचे मटेरियल घेण्यासाठी बुधवारी दुपारी अमळनेरला गेला होता. सायंकाळी परत येत असताना रेल्वे उड्डाणपुलाच्या वळणावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकी पुलावरून खाली कोसळली. नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला मार बसल्याने गंभीर अवस्थेत धुळे येथे हलविण्यात आले. गुरुवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी कळमसरे येथे अंत्यसंस्कार करण्यात झाले. विकासची आई कळमसरे येथे माहेरी राहत होती. मोलमजुरी करून दोन्ही मुलांचे संगोपन केले. वर्षभरापूर्वीच विकासचे लग्न झाले. त्याच्या पश्चात एक लहान भाऊ, पत्नी व आई असा परिवार आहे.