रावेर : प्रतिनिधी
निंबोल येथील श्रीकृष्ण केला चिप्स फॅक्टरीतील पाच लाख रुपयांच्या विविध यंत्रांची चोरी झाल्याची फिर्याद मालक नीरज सुनील पाटील यांनी दिली होती. मात्र विम्याच्या रकमेसाठी हा चोरीचा बनाव नीरज पाटील (वय २४) यानेच रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नीरज पाटील याने चिप्स फॅक्टरीवर पाच लाखांचा विमा काढला होता. या रकमेचा फायदा घ्यावा यासाठी त्याने दोन नोकराच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि चोरी केली. त्यानंतर स्वतः पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या गुन्ह्यात तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे कारवाई केली. त्यात नीरज पाटील, उमेश शांताराम सुतार (वय २४) कौशल जितेंद्र जंजाळकर (वय १९) रा. रावेर यांना पोलिस ठाण्यात आणले आणि चौकशी केली. त्यात त्यांनी चोरीची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.