धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील वृद्ध जगन्नाथ तुकाराम धनगर यांच्या मुलांनी त्यांना अंधारात ठेवून शेतजमीन परस्पर नावावर करून दिल्याने हतबल झालेल्या वृध्दाने तहसीलदारांचे दार ठोठावले. वृध्दांची कहाणी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी ऐकल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की, जगन्नाथ मोतीराम धनगर रा. गुजराती गल्ली, धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांना दिलीप धनगर, गोविंदा धनगर आणि अरूण धनगर ही तीन मुले आहे. दरम्यान तिन्ही मुलांनी त्यांना अंधारात ठेवून सन २०१९ कोऱ्या कागदावर अंगठा परस्पर टेकवून घेतला व त्यांच्या नावे असलेली धरणगाव तालुक्यातील बोरगांव शिवारातील गट नं ११७/१ क्षेत्र ०.९७ आर व ११७ क्षेत्र ३.०५ हे. आ. ऐवढी शेतजमीन परस्पर नावावर करून घेतले आहे. त्यानंतर त्यांना घरातून हाकलून दिले आहे. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाह नसल्यामुळे आता उपासमारीची वेळ आली.
या बाबीची तक्रार करण्यासाठी जगन्नान धनगर आज तहसील कार्यालय धरणगाव येथे आले असता त्यांनी त्यांची कैफियत ऐकून घेतली व त्यांना जमिनीचे सातबारा उतारा ऑनलाइन स्वतः काढून तपासणी करून योग्य मार्ग दाखवला. त्यामध्ये त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आई-वडील जेष्ठ नागरिकांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 45 11 व 16 प्रमाणे दाद देण्याचे अधिकार प्रांत अधिकारी एरंडोल यांचे असल्याचे समजावून सांगितले व त्या ठिकाणी अर्ज करण्याचे सूचित केले परंतु आज रोजी वृद्धापकाळामुळे व निराशेमुळे आत्महत्येच्या मार्गावर निघालेल्या सदर व्यक्तीला अर्ज करण्याचेही भान नसल्याचे ओळखून तहसीलदार यांनी स्वतः महसूल सहाय्यक श्री पंकज शिंदे यांच्या मदतीने अर्ज स्वतःच्या कॉम्प्युटरवर टाईप करून देऊन सर्व कागदपत्रे प्रिंटाऊट व झेरॉक्स काढून सदर प्रस्ताव तात्काळ बनवून शिपाई निजाम शेख यांच्याहस्ते प्रांत कार्यालय एरंडोल येथे दाखल केला. या तात्काळ कार्यवाहीमुळे सदर वृद्ध इसमाने अतिशय समाधान व्यक्त केले व माझ्या मुलांपासून मला न्याय मिळावा ही विनंती केली आहे.
तहसीलदार धरणगाव यांनी सदर वृद्धास आपल्या शासकीय वाहनांमध्ये घरापर्यंत वाहनचालक मनोज पाटील यांच्या मदतीने सोडले.