जळगाव : प्रतिनिधी
शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी करुणा संतोष बोदडे (२२, रा. वढोदा ता. यावल, ह.मु.दीक्षितवाडी, जळगाव) हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने खोलीत एकटी असतानाच करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना रविवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळची यावल तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी असलेली करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात (नर्सिंग) पदव्युत्तरचे (जीएनएम) शिक्षण घेत होती. ती अन्य तीन मैत्रिणींसह दीक्षितवाडीमधील वानखेडे इमारतीमध्ये भाडे तत्वावरील खोलीत राहत होती. यामधील तीन विद्यार्थिनी सुटी असल्याने गावाकडे गेल्या होत्या. खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेवण केले त्यानंतर पाणी भरले, असे घरमालक महिलेने सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच करुणा ज्या भागात राहत होती, त्या भागात मैत्रिणी आल्या. त्या ठिकाणी त्यांनी मोठा आक्रोश केला. तसेच संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात आले. त्यावेळी त्यांनीही मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.