जळगाव : प्रतिनिधी
एकाच परिसरातून वेळोवेळी १५ बकऱ्या चोरणाऱ्या सरफराज उर्फ सोनू सईद खान या रिक्षाचालकासह त्याची पत्नी मजीना सरफराज खान या दोघाना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. बकऱ्या चोरीसाठी वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरातून बकऱ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढून एका पाठोपाठ १५ बकऱ्या चोरीला गेल्या या संदर्भात इंदुबाई रामा माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यावरून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना बकऱ्यांची चोरी सरफराज खान व त्याची पत्नी मजीना खान यांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी दोघांना रिक्षासह ताब्यात घेतले व बकरी हस्तगत केली.