धुळे : प्रतिनिधी
पाइप विक्री करण्याच्या बहाण्याने जळगाव येथील एका व्यापाऱ्याला साक्री तालुक्यातील हट्टी शिवारात बोलावून त्याला मारहाण करीत त्याच्याजवळील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख असा एकूण ३ लाख १६ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी निजामपूर पोलिसांत ४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, व्यापारी जावेद आबीद देशमुख (वय ४८, रा. रजा कॉलनी, मेहरूण जळगाव) यांनी निजामपूर पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, पाईप विक्री करण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी हट्टी खुर्द येथे बोलावून आरापाना येथे पोहोचल्यावर संशयितांनी त्या परिसरातील जंगलात नेऊन पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, २ लाख ८६ हजार रूपयांची रोख रक्कम व १० हजार रूपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख १६ हजारांचा ऐवज लुटून घेतला. व्यापाऱ्याला मारहाण करून त्याला दुचाकीवर बसवून रस्त्यावर सोडून दिले.
याप्रकरणी निजामपूर पोलिसात चरणदास भोसले (४५), अवतार पवार (४२), सुदेश खोकट्या चव्हाण (४८), सचिन देसाई (४२), भय्याजी मकाला पवार (३९), संजय भोसले (३८), आरेश पवार (३७) यांच्यासह एक महिला (सर्व रा. जामदा, ता. साक्री) यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.