यावल : प्रतिनिधी
नंदुरबारहून भुसावळ येथे अवैध वाळू नेणारा ट्रॉला यावल तालुक्यातील किनगावजवळ यावलच्या महसूल पथकाने पकडला. ही कारवाई ४ रोजी मध्यरात्री करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १२:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील अंकलेश्वर- बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर साडेसहा ब्रास अवैध वाळू वाहकरताना हा ट्रॉला किनगावजवळ साकळी मंडळाधिकारी व तलाठी यांनी पकडून यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखा यांनी नंदुरबार येथून भुसावळ येथे वाळू वाहतुकीचा दिलेला चालकाजवळील परवाना पाहिला असता वाळू वाहतूक परवान्याची मुदत वेळ बुधवारी, ३ रोजी सायंकाळी ७:३० वाजेपर्यंत होती. परवान्यात नमूद वेळेव्यतिरिक्त अवैधपणे वाहतूक करताना ट्रॉला (एमएच १५ एमएम ६०६०) आढळल्याने हा ट्रॉला यावल तहसील कार्यालयात जमा केला.