नंदुरबार : वृत्तसंस्था
राज्यात उन्हाळा कहर सुरु असतांना यात हंगामी फळ म्हणून आंबा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंब्यांची आवक होत असून मागणी देखील मोठी असते. दरम्यान, यंदा वातावरण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहरात असताना ढगाळ वातावरण, वारा, पाऊस यामुळे मोहोर गळून पडला. त्यामुळे कैरी उत्पादनात घट होणार आहे. परिणामी कच्च्या कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनावर देखील याचा परिणाम पाहण्यास मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधव कैरीपासून तयार होणाऱ्या आमचूर उत्पादनासाठी तयारी करत आहेत. परंतु यंदा निसर्गाने मोहोरवर अवकृपा दर्शवल्याने कैरी उत्पादन दीड महिना लांबवणीवर पडले आहे. सातपुड्यातील पहिला मोहोर आल्यानंतर लागलीच हवामान दोन वेळा खराब होऊन तीन वेळा आंब्याच्या झाडांना बहर आला आहे. यामुळे झाडावर आलेली कैरी अद्याप पूर्णपणे तयार झालेली नसल्याने आमचूर उत्पादक प्रक्रिया उशीर होणार आहे.
नंदुरबारच्या आदिवासी भागात दरवर्षी आमचूर प्रक्रिया उद्योगातून लाखो रुपयाची उलाढाल होत असते. या उद्योगामुळे आदिवासी बांधवाना रोजगार देखील मिळत असतो. मात्र यंदाच्या वातावरण बदलामुळे कैरी उत्पदनावर परिणाम झाल्याने प्रक्रिया उद्योगाला यंदा उशीर होणार असल्याने रोजगार देखील उशिरा मिळणार आहे.