यावल : प्रतिनिधी
निंबादेवी (यावल) वनक्षेत्रातील एका नाल्यात २५ हजार रुपये किमतीचा खैर लाकडाचा साठा जप्त करण्यात आला आहे. वृक्षतोड करणारा आरोपी पसार झाला आहे. त्यामुळे हा साठा यावल येथील मुख्य विक्री केंद्रात पाठविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल वनक्षेत्रातील पथक गस्त घालत असताना एका नाल्यात वृक्षतोड करून लाकडाचा साठा दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार निंबादेवी क्षेत्राच्या नवरक्षकांनी हा साठा ताब्यात घेतला आहे. ५१ घनमीटर एवढा हा लाकडाचा साठा असून, त्याची किंमत २५ हजार ५८४ इतकी आहे. अज्ञात आरोपीविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वन संरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय बोराडे, विपुल पाटील, वनरक्षक अक्षय रोकडे, हनुमंत सोनवणे, सुधीर पटणे, चेतन शेलार, अशोक राठोड व रोपवन संरक्षण मजूर, फायर वॉचर सहभागी झाले होते.