भुसावळ : प्रतिनिधी
येथील रेल्वे स्थानकावर विक्रत्यांच्या दोन गटातील वाद सोडविताना आरपीएफ निरीक्षक राधाकिशन मीना (४२) व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांना काही विक्रेत्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी आल्यावर कोणी कोठे मालाची विक्री करावी, यावरून विक्रेत्यांमध्ये हा वाद पेटला होता. वाद वाढत असल्याने आरपीएफचे एएसआय दीपक तायडे यांनी राधाकिशन मीना यांना ही माहिती दिली. मीना हे घटनस्थळी आल्यावर त्यांनी जवळपास शंभरावर लोकांचा वाद सोडवून त्यांना शांत केले.
परंतु जमावामधील सद्दाम शेख बशीर, आझाद शेख बशीर, शेख सलमान शेख बशीर, मुझफ्फर सय्यद लियाकत अली, शेख समीर शेख हमीद, वसीम खान बिस्मिल्ला खान व इतरांनी निरीक्षक मीना व त्यांचे सहकारी आरक्षक महेंद्र कुशवाह यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी जीआरपी पोलिस ठाणे, भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींवर रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती.