धुळे : प्रतिनिधी
प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दोंडाईचा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याकडून दीड लाख रुपये स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चे दोन कर्मचारी सोमवारी सायंकाळी एसीबीच्या सापळ्यात अडकले. ही लाच निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने शिंदे यांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली.
दोंडाईचा शहरातील जैन मंदिर परिसरात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कर्मचारी अशोक पाटील आणि नितीन मोहने हे दोघे सापळ्यात अडकले.अधिक चौकशी व कॉल डिटेल्सची तपासणी केली असता, त्यांनी ही लाच एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या सांगण्यावरून मागितल्याचे व स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.