लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासह पथकाने शहरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ९ जुगार अड्ड्यावर कारवाई करून २९ जुगारांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ४१ हजार ९४२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकाने ९ ठिकाणी छापेमारी करून पोलीसांनी रोकड व मुद्देमाल जप्त केला. यात ९० हजार ९४२ रूपयांची रोकड, जुगाराचे साहित्य आणि १ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी, ३१ हजार रूपयांचे मोबाईल असा एकुण २ लाख ४१ हजार ९४२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, शिरसोली रोडवरील एल.एच पाटील हायस्कूलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत, सिंधी कॉलनी, तांबापुरातील शेरा चौक, अब्दुल हमीद चौक तांबापुरा, गुजराल पेट्रोल पंप परिसर, कुंभारवाडा, सोमानी मार्केट पिंप्राळा आणि शनिपेठ हद्दीतील इस्लामपूर या नऊ ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २, शनिपेठ पोलीस ठाण्यात २ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात एक असे ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.