जळगाव : प्रतिनिधी
दुचाकी चोरून त्यावर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार, १ एप्रिल रोजी मेस्कोमातानगर परिसरातून अटक केली. विशेष म्हणजे, दोघांचे पहिले व आडनाव सारखे आहे. मेरा भाई ऊर्फ राहुल रवींद्र कोळी (वय २२) व पप्पू ऊर्फ राहुल रामदास कोळी (२८) दोघे रा. मेस्कोमातानगर अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेस्कोमातानगरात दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश वाघमारे, सहायक फौजदार अनिल जाधव, पोहेकाँ महेश महाजन, नंदलाल पाटील, हेमंत पाटील, बबन पाटील, भगवान पाटील, ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी या पथकाने राहुल रवींद्र कोळी याला मेस्कोमातानउगरातून अटक केली. त्याच्याजवळ चोरीची दुचाकी (क्र. एमएच १९ डीएच ७७८९) आढळून आली. चौकशी केल्यानंतर त्याने ही दुचाकी साथीदार रवींद्र रामदास कोळी याच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यालादेखील ताब्यात घेतले. चौकशीत दुचाकीवरील क्रमांक हा बनावट असल्याची कबुली दिली. ही दुचाकी शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चार वर्षांपूर्वी चोरीला गेली होती.