जळगाव : प्रतिनिधी
मध्यस्थीच्या माध्यमातून झालेल्या विवाहानंतर अडीच महिने संसार केल्यानंतर माहेरी गेलेली नववधू बेपत्ता झाल्याची घटना घडली. लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्यांसोबत संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये वरपक्षाची अडीच लाखात फसवणुक झाली असून याबाबतची तक्रार एमआयडीसी पोलिसात दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, समाजात मुलींची संख्या घटत असताना उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढत असल्याने तरुणांच्या लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दलालांच्या माध्यमातून व ओळखीतून मुलीकडील व्यक्तींना पैसे देऊन लग्न लावले जात असल्याने तालुक्यातील बिलवाडी येथे असाचा प्रकार उघडकीस आला आहे.
या गावातील समाधान पंढरीनाथ पाटील या तरुणाचा विवाह मध्य प्रदेशातील निर्मला पावरा या तरुणीशी दि. १२ नोव्हेबर २०२३ रोजी नांद्रे, ता. पाचोरा येथील भवानी माता मंदिरात पार न पडला. लग्नानंतर ही नववधू ही घरात सर्वांची काळजी घेत चांगला मी संसार करू लागली. भावाच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम असल्याने माहेरी जायचे असल्याचे निर्मला पावरा या तरुणीने घरात सांगितले. त्यासाठी समाधान व ती दि. ७ जानेवारी २०२४ रोजी चोपडा येथे गेले.
चकवा देत काढला पळ विवाहितेचे काका रामसिंग पावरा याने तिला दुचाकीवर नेले, व तुम्ही तुमच्या दुचाकीवर या, असे समाधानला सांगितले. त्यानुसार समाधान हा त्यांच्या वडिलांसह सेंधवाकडे जात असताना बलवाडी येथे रामसिंग पावरा याने चकवा देत पळ काढला. तेव्हापासून निर्मला पावरा ही बेपत्ता असून तिच्याशी संपर्कही होत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा चोपड़ा तालुक्यातील चौगाव येथील कैलास पाटील नामक व्यक्ती आहे. त्याच्या मध्यस्थीतूनच हा विवाह झाल्याचे पंढरीनाथ पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कैलास पाटील, रामसिंग पावरा, त्याचा पुतण्या, निर्मला पावरा, सुभराम पावरा, दिलीप पावरा, कालू पावरा अशा सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.