धुळे : वृत्तसंस्था
पांढऱ्या भिलाव्याचे आमिष दाखवित नाशिक जिल्ह्यातील एकास तालुक्यातील अजनाळे शिवारात लुटण्यात आले. गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करत त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड हिसकावून नेली. ही घटना एप्रिल २०२२ मध्ये घडली. या प्रकरणी तब्बल दोन वर्षांनंतर धुळे तालुका पोलिस ठाण्यात पितापुत्रासह सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नानाजी शहाजी बंदरे (वय ४२, रा. मौजे वखारी, ता. देवळा जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली. त्यांना विनोद ग्यानदेव चव्हाण (वय ५२) व चॅम्पियन विनोद चव्हाण (वय ३५, रा. अजनाळे ता. जि. धुळे) यांच्यासह चौघांनी ‘पांढरा भिलावा देतो’, असे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांना धुळे तालुक्यातील अजनाळे गाव शिवाराजवळ असलेल्या डोंगरातील नाल्यात बोलावून घेतले. तेथे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील दोन लाखांची रोकड ठेवलेली पिशवी व खिशातील ५ हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. ही घटना एप्रिल २०२२ अखेरीस घडली. तालुका पोलिसात या प्रकरणी सहा जणांवर भादंवि कलम ३९५, ३२३, ५०४, ५०६ सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ चे उल्लंघन २५ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे