जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कंडारी रायपूर परिसरातील वाघूर धरणात रंगपंचमी खेळून झाल्यावर पोहायला गेलेला तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २५ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दि. २६ मार्च रोजी २४ तासांनी दुपारी १ वाजता मिळून आला आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील रोहित कैलास पाटील (वय १८) असे मयत इसमाचे नाव आहे. तो कुसुंबा गावात आई, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात तो कामाला होता. सोमवारी दि. २५ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त गावात तरुणांनी होळी खेळली. त्यातील काही तरुण हे पोहण्यासाठी कंडारी-रायपूर शिवारातील वाघूर धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील रोहित पाटील याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याला शोधले. ग्रामस्थांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा शोध घेतला.
अखेर मंगळवारी दि. २६ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रोहितचा मृतदेह धरणात मिळून आला. त्याला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. (KCN) तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी कुसुंबा गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.