धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यात सोमवारी रंगपंचमीचा सर्वत्र उत्साह सुरु असतांना एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जितेंद्र माळी (20, रा.लोहार गल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रंगपंचमी खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर मित्रांसह पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून काढण्यात यश आले. दरम्यान, रंगपंचमीच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे धरणगावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मयत जितेंद्रच्या आई-वडिलांनी मोठा आक्रोश केल्याने अनेकांचे मन हळहळले.