चाळीसगाव : प्रतिनिधी
वाहनातून देशी विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या इसमास पोलिस पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या वाहनातून देशी- विदेशी दारू, बिअर व वाहन असा एकूण ५ लाख १८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनतर्फे नाकाबंदी करण्यात आली.
२३ रोजी ७:३० वाजेच्या सुमारास पोनि. संदीप पाटील, योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, नीलेश पाटील, कल्पेश पगारे, महेंद्र सूर्यवंशी हे वाहनांची तपासणी करीत असताना चाळीसगाव शहरातून खडकी गावाच्या दिशेने मारुती येताना दिसली या वाहनावर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना संशय आल्याने वाहन थांबवून तपासणी केली. त्यात देशी-विदेशी दारूच्या व बियरच्या बाटल्या खोक्यात दिसून आल्या. या वाहनचालकाकडे दारू वाहतुकीचा परवाना नसल्याने वाहनाचा झडती पंचनामा केला. त्यात १८ हजार ४६० रुपये किमतीची देशी-विदेशी व बियर सापडली आहे. वाहनचालक प्रीतम बाळकृष्ण देशमुख (२६, तळेगाव, ता. चाळीसगाव) यास वाहनासह ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे