जळगाव : प्रतिनिधी
चालत्या रिक्षामध्ये त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबवताच रिक्षातून खाली पडून संजय आधार शिंपी (५५, रा. अर्जुन नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, २४ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. शिंपी यांचा मृत्यू नेमका उष्माघाताने की हृदयविकाराने झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन नगरमधील रहिवासी असलेले संजय शिंपी हे रिक्षाचालक होते. रविवारी दुपारी ते बसस्थानकाकडून जिल्हा क्रीडा संकुलाकडे रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३१६७) घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांना त्रास होऊ लागला त्या मुळे त्यांनी रिक्षा थांबवली व काह क्षणातच ते खाली कोसळले.
शिंपी यांचा रिक्षावरच उदरनिर्वाह होता. ज्यावर उदरनिर्वाह चालायच्या त्याच रिक्षातून ते खाली पडले व नागरिकांनी या रिक्षामधूनच त्यांना रुग्णालयात नेले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत