चोपडा : प्रतिनिधी
नवीन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस कुंटणखान्यावर बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांनी धाड टाकून देहविक्रय करणाऱ्या आणि त्यांना हा व्यवसाय करायला भाग पाडणाऱ्या एकूण ६० महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील या परिसरात गुन्हेगारी तसेच दुचाकी चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. या कारणावरून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशावरून पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि पथकाने ही कारवाई केली आहे. या सर्व महिलांना रात्री उशिरा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी सुरु होती. सर्वच देहविक्रय करणाऱ्या पीडित महिलांना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार असून कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
हा कुंटणखाना अनेक वर्षे सुरु असताना पोलिसांनी आताच कारवाई केली. कारण याठिकाणी ग्राहक म्हणून येत असलेल्या लोकांच्या दुचाकींची चोरी होत होती. त्याबाबतच्या तक्रारी वारंवार येत होत्या. याच परिसरात चोऱ्या का होतात? याचा तपास पोलिसांनी सुरु केला. पोलिस अधिक्षकांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत या दुचाकी प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कुंटणखान्यावर धाड टाकली. त्यातून दुचाकी चोऱ्यांवरही प्रकाश पडू शकेल, असा पोलिसांना विश्वास आहे.