चाळीसगाव : प्रतिनिधी
रेल्वेच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा डंपर व मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन महिला जागीच ठार, तर १७ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री दहा वाजता हिरापूर गावानजीक एका हॉटेलजवळ घडली. अपघात होताच डंपर चालक तेथून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनीबाई सोमनाथ यादव (३०, रा. तिनगडा ता. जि. कबीरनाथ छत्तीसगड) व सरस्वती रामप्रसाद उईके (१७ वर्ष रा. दामितितराहि ता.जि. डिडोरी म.प्र.) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून येथे २५ ते ३० मजूर काम करीत होते. हे काम पूर्ण झाल्याने हे मजूर २० रोजी कटनी पॅसेंजरने गावाकडे जाणार होते. १९ रोजी सर्व मजूर डंपरने भुसावळकडे निघाले. रात्री दहा वाजेच्या सुमारास हिरापूर गावानजीक चाळीसगावहून नाशिककडे भाजीपाला घेऊन जात असलेले मालवाहतूक करणारे वाहन यांच्यात जबर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहने उलटली. यात वरील दोन महिला जागीच ठार झाल्या. डंपरमध्ये बसलेल्या इतर लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. रात्री अपघाताची माहिती कळताच हिरापूर ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक व पोलिसांनी वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून दवाखान्यात आणले. याप्रकरणी संतराम बाबूराम मरकाम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.