जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शनी पेठ पोलिसांनी कांचन नगर परिसरात लोखंडी कोयता घेऊन फिरणाऱ्या हद्दपार गुन्हेगाराला सोमवारी १८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता पाठलाग करून संशयित आरोपी गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (वय-२५) याला अटक करत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचन नगर भागात दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे हा कमरेला कोयता लावून दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी १८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता पथकाने कारवाई करत संशयित आरोपी गणेश उर्फ काल्या रविंद्र सोनवणे याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपी याच्यावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश केलेले आहे.
पोलीस अधिक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शनीपेठ पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे. हे कारवाई शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे, राहुल पाटील, अनिल कांबळे, मुकुंद गंगावणे यांनी केले आहे.