जळगाव : प्रतिनिधी
डंपर मागे घेत असताना गॅरेजवर काम करणारा दीपक सदाशिव खजुरे (२८, रा. तानाजी मालुसरे नगर) हा मेकॅनिक डंपर व झाडाच्यामध्ये दाबला गेला. यात त्याच्या छातीच्या बरगड्या, खांद्याचे हाड तुटून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १६ मार्च रोजी ऑटोनगरमध्ये घडली. या प्रकरणी १७ मार्च रोजी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव भुसावळ रस्त्यावरील ऑटोनगरमध्ये दीपक खजुरे हा तरुण एका गॅरेजवर काम करतो. १६ मार्च रोजी गॅरेज मालक व सदर तरुण काम करत असताना गॅरेजसमोरून एक जण डंपर (क्र. एमएच १९, सीएक्स ०३४१) मागे घेत होता. त्या वेळी डंपरच्या मागे असलेला दीपक हा तरुण डंपर व झाडाच्यामध्ये दाबला गेला. आजूबाजूच्या नागरिकांनी डंपर चालकाला डंपर पुढे घेण्यास सांगितले असता त्याने उलट मागे घेतले. असे दोन वेळा झाल्याने तरुण अधिकच दाबला गेला. त्यामुळे त्याच्या छातीच्या बरगड्या तसेच खांद्याचेही हाड तुटले आहे. या घटनेनंतर डंपर चालक तेथून निघून गेला. या प्रकरणी दीपक खजुरे याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.