यावल : प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रक जप्त करण्यात आला होता. तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा काढून हा ट्रक पळवून नेण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या पथकाने रविवारी रात्री वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आणि तो तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला होता. हा ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान, सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन जणांनी तहसील कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून सीसीटीव्ही कॅमेरा काढून टाकला आणि आवारात लावलेला ट्रक पळवून नेला.
या प्रकरणी किनगाव येथील कोतवाल गणेश रमेश वराडे यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून भूषण विठ्ठल कोळी, स्वप्निल तुषार कोळी आणि विठ्ठल भाऊलाल कोळी (सर्व रा. रिधूर, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३४१, ४२२, तसेच गौणखनिज कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. वासीम तडवी हे करीत आहेत.