छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
आजकाल शेतीच्या वादातून लोक आपली नाती विसरतात, आणि एकमेकाच्या जीवावर उठतात अशीच एक घटना सिल्लोड तालुक्यात घडली आहे. शेती व घराच्या वाटणीच्या वादातून सख्ख्या व चुलत भावानी मिळून दगड, विटानी हल्ला करून भावाचा खून केला. ही घटना पिरोळा (ता. सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर) येथील शेतात शनिवारी (दि. १६) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी खून करणाऱ्या दोघा भावांना अटक केली आहे.
या घटनेत खून झालेल्या भावाचे नाव जम्मन त्र्यबंक गोरे (वय ६५, रा. भराडी ह.मु. पिरोळा ता. सिल्लोड) असे आहे. तर त्यांचा खून करणाऱ्या आरोपी सख्ख्या भावाचे नाव रघुनाथ त्र्यबंक गोरे व चुलत भावाचे नाव कृष्णा रघुनाथ गोरे (रा. भराडी ह.मु.पिरोळा शिवार ता. सिल्लोड) असे आहे. या दोघा आरोपींना सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी रविवारी सकाळी अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, या घटनेतील मयत जम्मन गोरे हे पिरोळा येथील त्यांच्या सामायिक शेतातील गट क्रमांक ८२ मध्ये राहत होते. दोन्ही सख्ख्या भावांची वरील गटात सामायिक शेतजमीन आहे. त्यांचा जमीन वाटणीवरून गेले अनेक दिवसापासूनचा वाद होता. याच जमीन वाटणीच्या कारणावरून शनिवारी (दि.१६) रात्री दोन्ही भावात शेतातच वाद झाला. त्याचे पर्यावसन तुंबळ हाणामारीत झाले. रागाच्या भरात आरोपी रघुनाथ गोरे व कृष्णा गोरे यांनी भाऊ असलेल्या जम्मन गोरे यांच्यावर दगड विटांनी हल्ला केला. या हल्ल्यात जम्मन गोरे यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते रक्त बंबाळ झाले. तरीही आरोपितांनी दगड विटांनी ठेचून त्यांचा खून केला. त्यात जम्मन गोरे हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मयत जम्मन गोरे यांचा मुलगा सागर जम्मन गोरे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिसांना दिली. या माहिती मिळताच शनिवारी मध्यरात्री उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक एल एस घोडे, सचिन क्षिरसागर, कर्मचारी सचिन सोनार, यांनी घटनास्थळी भेट दिली व रविवारी सकाळी ७.१५ वाजता आरोपीना बेड्या ठोकल्या