चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील श्यामवाडी येथील २८ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत १६ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेवणनाथ संभाजी माळी (२८, शामवाडी ता.चाळीसगाव) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे, रेवणनाथ माळी हा श्यामवाडी येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. १५ रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास गावाजवळील एका विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह बाहेर काढून चाळीसगाव येथे रवाना करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. तपास पोलिस नाईक भगवान माळी हे करीत आहेत.