जळगाव : प्रतिनिधी
एप्रिल २०२३-२४ या कालवधीत तीन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या नियमीत शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरावी लागणार आहे. त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना चेअरमन संजय पवार यांनी सांगितले की, जिल्हा बँकेकडून एप्रिलमध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड ३१ मार्चपर्यंत करावी लागते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची वसूली व्याजासह करावी असे आदेश दिले होते. मात्र या आदेशामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली होती. याबाबत नुकतीच नाशिक येथे सहकार मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी घेतलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे देखिल व्याजमाफीची विनंती करण्यात आली होती. शासनाच्या मान्यतेनुसारा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्’ातील कर्जदार शेतकरी सभासदांसाठी व्याजमाफी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. तीन लाखांपर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्चपर्यंत कर्जाची केवळ मुद्दल भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही संजय पवार यांनी केले आहे.
जळगाव जिल्हयातील १ लाख ९० हजार शेतकरी सभासदांना सुमारे १२०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी ३१ मार्च शेवटची मुदत असून रविवारी सुटीच्या दिवशी देखिल बँक सुरू राहणार असल्याचे चेअरमन संजय पवार यांनी सांगितले. तसेच व्याजमाफी योजनेत शेतकऱ्यांना सुमारे ७२ कोटींची व्याजमाफी होणार आहे. जिल्हयात ८७६ विका संस्थांपैकी ५५१ संस्था अनिष्ट तफावतीत आहेत. या संस्थांकडे बँकेचे ६४० कोटींचे घेणे बाकी आहे. या निर्णयामुळे विकास संस्थांना ७० कोटी ४० लाखांचा फायदा होणार असल्याचेही संजय पवार यांनी सांगितले.