पाचोरा : प्रतिनिधी
मुलगा काही कामधंदा करत नाही व माझ्या जिवावर बसून खातो, याचा राग येऊन निवृत्त पोलिस बापाने मुलाच्या डोक्यात वखारटीची पास टाकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बापाला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाळण (विष्णूनगर) येथील निवृत्त पोलिस अजमल यमाजी चव्हाण (६०) हे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी दारू पिऊन आले असता पत्नी गंगाबाई अजमल चव्हाण यांनी स्वयंपाक करून जेवणास वाढले. यावेळी अजमल चव्हाण यांनी ताटात वाढलेली भाजी बेसिनमध्ये फेकून देत पत्नी व मुलास शिवीगाळ सुरू केली. यावेळी मुलगा कन्हैया हा वैतागून घरातील खोलीत जाऊन झोपला. यावेळी अजमल यांनी वखरटी करण्याची लोखंडी पास उचलून पत्नीला मारण्यासाठी धावले. पत्नीने बचाव करीत बाहेर पळ काढला. अजमल यांनी घरात झोपलेल्या मुलाच्या डोक्यावर लोखंडी पासचा वार केला. यावेळी गल्लीतील लोक जमा झाले. जखमी अवस्थेत कन्हैया यास उपचारार्थ जळगाव येथे हलवले. फिर्याद पत्नी गंगाबाई अजमल चव्हाण यांनी पाचोरा पोलिसांत दाखल केली आहे.