जळगाव : प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाऱ्यांच्या नावे ३० हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या जळगावातील खासगी महिलेस धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. बुधवारी २.१५ वाजता जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या आवारात हा सापळा यशस्वी करण्यात आला. विद्या परेश शाह (३८, रा. जुने भगवाननगर, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे पुरी, ता. रावेर येथे वडिलोपार्जित बागायत शेतजमीन आहे. या शेत जमितीत दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी व म्हशी विकत घेण्यासाठी कर्ज हवे हवे असल्याने त्यांनी दहा दिवसांपूर्वी जळगाव जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधला असता तेथे संशयित विद्या परेश शाह (खासगी महिला) हिने तक्रारदार यांना तिची जळगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवले व कर्ज प्रकरण मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपये लाच मागणी केली होती.