लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार आज गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
असे असतील नवे निर्बंध ?
बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू
परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.