जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि चाळीसगाव पोलीसांच्या सतर्कतेने गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात सहा जणांना अटक करण्यात यश आले आहे. यात चाळीसगाव पोलीसांनी केलेल्या कारवाईत चार गावठी पिस्तूल, ५ मॅगझीर, १० जिवंत काडतूसासह १ जणांना अटक केली तर चोपडा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ९ गावठी पिस्तूल, २ मॅगझीन, २० जिवंत काडतूसासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पेालीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ते मध्यप्रदेश बॉर्डर असलेल्या उमर्टी येथील येथून अवैधरित्या गावठी पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळाली. त्यानुसार पथकाने कृष्णापुर ते उमर्टी दरम्यानच्या डोंगराळ भागातील रस्त्यावर चौघांवर कारवाई केली. यात संशयित आरोपी हरजणसिंग प्रकाशसिंग चावला वय-२०, मनमितसिंग ध्रुवासिंग बर्नाला वय-२० दोन्ही रा. उमर्टी मध्यप्रदेश, अलबास दाऊद पिंजारी वय-२७ रा. हरीविठ्ठल नगर जळगाव आणि अर्जुन तिलकराज मलिक वय-२५, रा. अमृतसर पंजाब या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ९ गावठी पिस्तूल, २० जिवंत काडतूस, २ रिकामे मॅगझीन, ४ मोबाईल आणि २ मोटरसायकल असा एकूण ४ लाख ७ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अलबास दाऊत पिंजारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या स्वरूपाचे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोहेकॉ शशिकांत पारधी, किरण पाटील, गजानन पाटील, संदीप निळे, होमगार्ड छावऱ्या बारेला, सुनील धनगर, श्रावण तेली, संदीप सोनवणे यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाळीसगाव शहरातील धुळे रोड व नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदीत मोटरसायकल क्रमांक (एमएच १२ व्हीएक्स ३००८) वरून येतांना दोन जण संशयास्पद रित्या हालचाली करत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. त्यानंती चाळीसगाव शहर पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला. यातील अमीर आसिर खान (वय-२०, रा.काकडे वस्ती पुणे) याला अटक केली. तर दुसरा त्याचा साथीदार आदित्य भुईनल्लू रा. पुणे फरार झाला. अटकेतील संशयित आरोपीकडून गावठी बनावटीचे ४ पिस्तूल, ५ मॅक्झिन, १० जिवंत काडतूस, एक मोटरसायकल असा एकूण २ लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आमीर आसीर हा पुण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल कसून त्याला पुण्यातून २ वर्षांकरीत तडीपार केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर ढिकले, पोउनि सुहास आव्हाड, योगेश माळी, पोहेकॉ राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्चे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील यांनी कारवाई केली आहे.