बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसाळा येथील शेतमजूर महिलांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली, या अपघातात नऊ महिला जखमी झाल्या. त्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. चार महिलांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरसाळा येथील शेतमजूर महिला तालुक्यातील शेवगा, चिखली येथे हरभरा काढणीसाठी गेल्या होत्या. या महिला दुपारी रिक्षा क्रमांक एम. एच.३०, एल. १३५५ ने परतत होत्या. त्यावेळी नाडगाव रस्त्यावर खासगी हॉस्पिटलजवळ दुपारी तीन वाजता रिक्षाचालक अजय शिवाजी सोनवणे (रा. माळेगाव) याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा दोन वेळा उलटली. यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. या अपघातात वंदना योगेश सूर्यवंशी (वय २०), अंजनाबाई दामू होडगरे, सुशीलाबाई विजय होडगरे, शीतल भागवत पाटील, वनिता राजेंद्र पाटील, कमलबाई राघो सूर्यवंशी (५५), सुमनबाई पंडित होडगरे (४०), सरस्वतीबाई जयमल पाटील (६५), शशिकला भारत सावळे (४०), चालक अजय सोनवणे हा जखमी झाला आहे. या सर्वांवर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
तर यातील सरस्वतीबाई जयमल पाटील, शशिकला भारत सावळे, सुमनबाई पंडित होडगरे, कमलबाई राघो सूर्यवंशी यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत वाहनचालकावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.