पुणे : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्य़ेला पुण्यातील जीएसटी कार्यालयातील एका महिला अधिका-यास लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे जीएसटी कार्यालयात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मालती रमेश कठाळे हिच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात कठाळे यांच्या विराेधात तक्रार दिली हाेती. व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन जीएसटी क्रमांक घेण्यासाठी वस्तू आणि सेवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज केला होता.
त्यासाठी व्यावसायिकाने अडीच हजार रुपये फी भरली होती. हे प्रकरण वर्ग-२ अधिकारी मालती कठाळे यांच्याकडे प्रलंबित होते. कठाळे यांनी व्यावसायिकास कार्यालयात समक्ष बोलावून जीएसटी क्रमांकांसाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली हाेती. एसीबीने तक्रारी शहनिशा करुन सापळा रचला. जीएसटी महिला अधिकारी कठाळे हिला तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने ताब्यात घेतले.