यावल : प्रतिनिधी
दहावीच्या इंग्रजी पेपरला झालेल्या कॉपीप्रकरणी जबाबदार धरत केंद्रप्रमुखांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमधील परीक्षा केंद्रावर गुरुवारी दुपारी ही कारवाई झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रप्रमुख एफ. एच. खान, केंद्र उपप्रमुख तुलसीदास चोपडे, ब्लॉकचे पर्यवेक्षक एस. एन. सोनवणे आणि मुख्याध्यापक जी. एल. खान यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. गुरुवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. दरम्यान, या परीक्षा केंद्रावर फैजपूर येथील सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका ब्लॉकमधील विद्यार्थिनी कागद बाहेर फेकताना आढळून आली. तेव्हा त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आणि केंद्रप्रमुखासह चार जणांवर कारवाईचे आदेश दिले.
गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. राजेंद्र पवार करीत आहेत. दहावी परीक्षेत कॉपीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची जिल्ह्यातील ही दूसरी घटना आहे. मागील आठवड्यात सामनेर, ता. पाचोरा येथील परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीप्रकरणी केंद्रसंचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.