धाराशिव : वृत्तसंस्था
राज्यातील राजकारण आगामी लोक्साभेपुर्वी चांगलेच तापले असतांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर लागलीच शिवसेनेच्या ठाकरे गटाने देखील दौऱ्याला सुरुवात केली असून धाराशिव जिल्ह्यातल्या औसा येथील सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींसह शहांवर टीकास्त्र सोडले आहे.
ठाकरे म्हणाले कि, अमित शहा शेपूट घाले गृहमंत्री आहेत. मणिपूर पेटले. तेव्हा तिकडे जायची हिंमत केली नाही. या नागोबाकडे काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही. अरुणाचलमध्ये चीन घुसतोय. मात्र, या सगळ्या ठिकाणी त्यांनी शेपूट घातले. मात्र, महाराष्ट्रात येऊन ते आमच्यावर फणा काढतायत, असा शब्दा उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर टीकेची झोड उठवली. शिवसेनाप्रमुख होते म्हणून मोदींची ओळख झाली. अटलबिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या डब्यात टाकायला निघाले होते. मात्र, तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांनी त्यांना वाचवले नसते, तर मोदी आज दिसलेच नसते म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांचा समाचार घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना फोडल्यानंतर त्यांना वाटले शिवसेना संपेल. मात्र, शिवसेना संपणार नाही. भाजपला संपवून, गाडून, मूठमाती देऊन शिवसेना पुढे जाईल. महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा असल्याचा शोध अमित शहा यांनी लावला आहे. ठीक आहे आमची सर्वसामान्यांची रिक्षा पंक्चर आहे. मात्र, तुमच्या ट्रिपल इंजिन सरकार तर भ्रष्टाचाराची चाके लागलेली असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, असे सध्या भाजपचे चालले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.