धरणगाव : प्रतिनिधी
सिंचन हा शेतीचा आत्मा असून सिंचनाचे क्षेत्र वाढले तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा कायापालट होतो. त्यांचे जीवनमान उंचावत असते. विजेच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कामांना आम्ही प्राधान्य दिले असून गावातील तरुणांना व्यायामासाठी लवकरच साहित्यासह व्यायामशाळा बांधकाम सुरू करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील बोराणार येथे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचे लोकार्पण व साठवण बंधाऱ्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
3 कोटी निधीच्या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बोरगाव ते टोळी व बोरगाव ते भालगाव या 1 कोटी 74 लक्ष निधी खर्च करून दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांचे लोकार्पण, 20 लक्ष निधीतून मारोती मंदीर परिसरात सभागृह तसेच नागीण नदीवर प्रत्येकी 50 लक्ष याप्रमाणे 1 कोटींचे दोन साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे बोरगाव व परिसरातील शेती सिंचनाखाली येवून हजारो शेतकऱ्यांना शेती विकासासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यावेळी गावातील अभ्यासिकेत 25 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकं संचाचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावात महाशिवरात्री अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहला पालकमंत्र्यांनी हजेरी लावून कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैया मराठे सर यांनी केले तर आभार ग्रा. पं. सदस्य नितीन पाटील सर यांनी मानले.
यावेळी सरपंच लक्ष्मण भिल, उपसरपंच महेश मराठे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, किशोर शेडगे, बापू पवार , दीपक पाटील, किशोर नांदळे, गोकुळ पाटील, भैय्या मराठे, माजी सभापती प्रेमराज पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, युवासेनेचे दिपक भदाने, सुधाकर पाटील, शरद पाटील, सचिन पवार, उगलाल पाटील, डॉ संदीप भदाणे, पोलीस पाटील किशोर भदाणे यांच्यासह ग्रामस्था मोठ्या संख्येने उपस्थित होते