मुंबई : वृत्तसंस्था
देशात नुकतेच भाजपची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यावर आता राज्यातील ठाकरे गटाने टीकास्त्र सोडले आहे.
”भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादीत आहेत, पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आले. नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मूळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अधःपतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला. या सगळय़ांचेच पंख कातरले. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे काय?”, असा सवाल ठाकरे गटाने मुखपत्रातून उपस्थित केला आहे.
”भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. कुणाच्या पुढे ‘हांजी हांजी’ करणारे नाहीत. देशात गेल्या दहा वर्षांत जो विकास झाला असे मानायचे, त्या विकासात सर्वाधिक योगदान गडकरी सांभाळत असलेल्या रस्ते निर्माण मंत्रालयाचे आहे. गडकरींनी निर्माण केलेल्या अनेक राष्ट्रीय प्रकल्पांची उद्घाटने पंतप्रधान मोदी यांनी केली, पण त्या कार्याचे श्रेय त्यांनी गडकरींना दिले नाही. मंत्रिमंडळात व भाजपमध्ये मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी. गडकरी यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे स्वाभिमान, अभिमानाचा ताठ कणा या मराठी नेत्याला लाभला आहे. अशा गडकरींचे आव्हान म्हणा की भीती, ही मोदी-शहांच्या व्यापार मंडळास वाटणारच” असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.