तक्रार : फेर प्रभाग रचनेची मागणी!
आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीची निवडणूक आयोगाकडे धाव
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचना फुटी प्रकरणी अखेर निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आलेली असून फेर प्रभाग रचनेची मागणी करण्यात आलेली आहे. आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे गटनेते प्रविण पाठक यांनी याबाबत तक्रार दिलेली असून तक्रारीच्या प्रति नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. टीईटीनंतर या प्रभाग रचना फुटी प्रकरणाकडे समस्त राज्याचे लक्ष लागून आहे. कोणत्या राजकीय पुढार्यांच्या सांगण्यावरून प्रभाग रचना करण्यात आली, कोणी केली व ती कोणी फोडली हे उजेडात कधी येणार याकडे समस्तांचे लक्ष लागून आहे.
पाठक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे, की मुदत संपणार्या व नवनिर्मित नगरपरिषदांचा निवडणुकींकरता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारुप आराखडे तयार करण्यात येत आहेत. त्यास अनुसरुन नगरपरिषद अमळनेर येथे देखील नविन प्रभाग रचनेचा कच्चा प्रारुप आराखडा मुख्याधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्याचे समजते. सदर प्रभाग रचना करतांना राज्य निवडणुक आयोगाच्या दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजीच्या पत्रानुसार क्र. 15, 16 अन्वये नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. असे असताना मुख्याधिकारी यांच्या दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी नोटीसीचे अवलोकन करता निवडणुक आयोगाचा नियम (सुचना) क्र. 15,16 चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रभाग रचना करतांना गोपनीयतेचा भंग झाल्याची बाब अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे प्रभाग रचना करतांना राजकीय दबाव, हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट होत आहे. काही राजकीय लोकप्रतिनिधींच्या सोयीनुसार प्रभाग रचना झाल्याची माहिती मिळत आहे. प्रथमदर्शनी माहितीनुसार प्रमुखमार्ग, राज्यमार्ग, रेल्वे ट्रॅक, नदी (नैसर्गिक सिमा) यांना कुठेही विचारात न घेता वस्त्यांचे विशिष्ठ राजकीय गटांच्या सोयीकरिता विभाजन मनमानी पध्दतीने केल्याचे जाणवत आहे. तरी वरील सर्व बाबी लोकशाहीसाठी घातक आहेत. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेवर शंका उत्पन्न करणार्या आहेत. यात जबाबदार दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच जिल्हाधिकारी अथवा वरिष्ठ अधिकार्याच्या देखरेखी खाली, मार्गदर्शनाने नियमांचे पालन करून फेरप्रभाग रचना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नवी निकोप प्रभाग रचना झाल्यास कोणावरही अन्याय होणार नाही.